लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या आठ, १० दिवसांपासून शहरातील सर्वच भागात वराहांचा रोजच अचानक मृत्यू होत असल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजे एकाच दिवशी तब्बल ४० मेलेले वराह पालिका सफाई कामगारांनी उचलल्याचेदेखील सांगितले जात आहे. वराह मृत्यूच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पालिका व पशुसंवर्धन विभागाने ठोस प्रयत्न करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. तळोदा शहरात वराहांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे वराह सर्वच भागात मोकाट फिरत असतात. साहजिकच त्यांचा उपद्रवामुळे शहरातील रहिवाशी अतिशय त्रस्त झाले आहे. त्यांच्या बंदोबस्ताबाबत सातत्याने मागणी होवूनही ठोस अशी कार्यवाही होत नाही. त्यामुळे वराहांची संख्या वाढत आहे. आता तर गेल्या आठ दिवसांपासून शहरातील सर्वच भागात अचानक चालता, चालता हे वराह खाली पडतात. आणि झोपेत मारतात, असे नागरीक सांगतात. त्यांचा अशा अचानक मृत्यूमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. एवढेच नव्हे त्यांचा दुर्गंधीमुळे अक्षरशः हैराण झाले आहे. जो पावेतो पालिका कर्मचारी येत नाही तो पावेतो रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत असते. या मेलेल्या वराहांचे मोकाट कुत्रे लचके तोडून इतरत्र फेकत असतात.पालिका सफाई कर्मचारी मेलेले वराह उचलून, उचलून अक्षरशः हैराण झाल्याचे कामगार सांगतात. एकाच दिवशी तब्बल ४० मेलेले वराह उचलल्याचे सांगण्यात आले. वास्तविक एवढ्या मोठ्या संख्येने रोज वराह मरत असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस प्रयत्न केले जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वराहांचा अशा अचानक मृत्यूच्या कारणाबाबत येथील पशु वैद्यकीय अधिकारींना विचारले असता सद्या वातावरणातील बदलांमुळे ताप, न्युमोनिया अथवा भुखमारीमुळे वराहांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. आधीच कोरोनाच्या लाटमुळे नागरिकांमध्ये अजूनही दहशत आहे. त्यात वरहांच्या मृत्यूचा घटनेने भर टाकली आहे. वराहांचा वाढता उपद्रवाबाबत पालिकेने ठोस कार्यवाही हाती घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
तळोद्यात वराहांच्या मृत्यूचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 2:57 PM