प्रा.आय.जी. पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत फुट पडल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार सुरूपसिंग नाईक यांच्या नावाने राज्यात नवापूर विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. सन 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच नंदुरबार तालुक्यातील धानोरा व आष्टे हे दोन जिल्हा परिषद गट जोडुन मतदार संघाची पुनर्रचना झाली. त्यात शरद गावीत यांना 2009 साली यश मिळाले होते.नवापूर मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व असलेले आमदार सुरूपसिंग नाईक यांनी यंदा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात वयाच्या कारणाने त्यांनी हा निर्णय आधीच जाहीर केल्याने त्यांच्याजागी त्यांचे पूत्र शिरीष नाईक काँग्रेसकडून निवडणूक लढविणार आहेत. आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन, आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष यासारखी महत्वाची पदे ते सांभाळत आहेत. गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीची सुत्रे त्यांच्या हाती होती. गत काही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रमुख विरोधक म्हणून समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रमुख विरोधक म्हणून विधानसभेत भाजपा प्रमुख विरोधक राहिली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत भाजपाच्या वाटेवर असून त्यांचे नाव इच्छुकांमधे पुढे झाले आहे. विसरवाडी एज्युकेशन सोसायटी व माणिकरावजी विद्या प्रसारक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. भाजपाकडुन उमेदवारी देतांना त्यांना प्राधान्य मिळेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. भाजपाचे जिल्हा चिटणीस असलेले व यापूर्वी विधानसभा निवडणुकीचा अनुभव असलेले अनिल मोहन वसावे हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म न पाळता काँग्रेसला सहकार्य न करता उघडपणे भाजपाचे कार्य करणारे माजी आमदार शरद गावीत यांचेही नाव भाजपकडून इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहे. वंचित आघाडी कडुनही शरद गावीत उमेदवारी करु शकतील अशीही राजकीय वतुर्ळात चर्चा आहे.
भाजपकडुन विद्यमान जि.प.सदस्य भरत गावीत, माजी आमदार शरद गावीत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनिल वसावे हे भाजपतर्फे इच्छूक आहेत. काँग्रेसकडून आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक यांचे नाव पुढे आले आहे.राष्ट्रवादी व वंचीत आघाडीराष्ट्रवादीकडून माजी आमदार शरद गावीत इच्छूक आहेत. परंतु ते वंचीत आघाडीकडून देखील निवडणूक लढवू शकतील. याशिवाय इतरही निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.