तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या एकूण १३४ सदस्यपदांसाठी ३३३ उमेदवारांसाठी शुक्रवारी ५५ केंद्रांवर १९ हजार ९०० मतदारांनी मतदान केले. यात १३ हजार ३० पुरुष तर १२ हजार ६०५ स्त्री मतदारांनी मतदान केले. एकूण ७७ टक्के मतदान झाल्याने गावोगावी प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. यातून सोमवारी सकाळी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतींत कोण निवडून येणार याबद्दल आडाखे बांधले जात आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. यासाठी तहसील कार्यालयात विशेष कक्ष स्थापन केला असून कार्यालयाबाहेर बॅरिकेटींग करण्यात आली आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना आत सोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. निकालांविषयी उमेदवारांचीही धाकधूक वाढल्याचे दिसून आले. दुसरीकडे तालुक्यातील काकडदा, धनाजे, मुंदलवड या गावांतील ग्रामपंचायत निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. काकडदा ही ग्रामपंचायत तालुक्यातील सधन ग्रामपंचायत मानली जाते. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व राहील याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. दरम्यान, तालुक्यातील वरखेडी ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक तीनमधील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे येथील निवडणूक रद्द केली आहे. या प्रभागातील निवडणूक कार्यक्रम नंतर जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
धडगाव तहसील कार्यालयात सोमवारी ३३३ उमेदवारांचा होणारा फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:28 AM