तळोदा : उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र व डिजिटल एक्स-रे अशा दोन वस्तूंची रुग्णांना नितांत गरज असल्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी महिला, बाल हक्क समितीकडे केल्यानंतर सदस्यांनी तातडीने कार्यवाही करण्याची सूचना जिल्हा आरोग्य विभागास दिली होती. त्यामुळे या यंत्रणेने आता ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तळोदा उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली आहे. परंतु येथे डिजिटल एक्सरे, रक्त साठवण केंद्र नसल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यासाठी गरीब रुग्णांना बाहेर न्यावे लागते. अशा वेळी नातेवाईकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असतो. साहजिकच या सुविधा उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात याव्यात यासाठी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे व अर्जून वळवी यांनी विधिमंडळाच्या महिला व बालकल्याण समितीच्या प्रमुख आमदार सरोज अहिरे यांची भेट घेऊन एक्स-रे व रक्त साठवणूक केंद्र अभावी रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असते. शिवाय गरीब आदिवासींना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो, अशी व्यथा सदस्यापुढे या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करून उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून, द्यावी अशी मागणी केली होती. त्यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक याना तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली होती. साहजिकच आता रुग्णांचा नातेवाईकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी पुढील कार्यवाही तात्काळ करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. रघुनाथ भोये, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनेक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
निधीची तरतूद आदिवासी विकास प्रकल्पातून व्हावी
तळोदा उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती आहे. कारण या ठिकाणी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील गंभीर रुग्ण पुढील उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र, नेमक्या याच सुविधा त्यांना मिळत नसल्याने नातेवाईकांना नाईलाजास्तव बाहेर अथवा खासगी दवाखान्यात न्यावे लागते. यात त्यांचा पैसा जातोच शिवाय वेळही जात असतो. अशावेळी गंभीर प्रसंगाला सुध्दा तोंड द्यावे लागत असल्याचे नातेवाईक सांगतात. निदान याबाबत आदिवासी जनतेच्या विकासाशी निगडित असलेल्या तळोदा आदिवासी विकास प्रकल्प प्रशासनाने तरी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. कारण तळोदा आदिवासी विकास प्रकल्पात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांचा समावेश आहे. साहजिकच प्रकल्प प्रशासनाने सकारात्मक विचार करून याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाशी समन्वय साधन्याची गरज आहे. तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनदेखील या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेऊ शकते.
सातपुड्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात डिजिटल एक्स रे व रक्त साठवण केंद्राची मागणी विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीचा सदस्यांकडे केली होती. त्यांनी लगेच जिल्हा आरोग्य विभागास कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. आता यांनी लवकर पुढील कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. - यशवंत ठाकरे, सभापती, पंचायत समिती, तळोदा