फळांची आवक वाढल्याने दरात घट
नंदुरबार : शहरातील फळबाजारात सफरचंदाची सर्वाधिक आवक सुरू असून १०० ते १२० रुपये दरात सफरचंद नागरिकांना उपलब्ध होत आहे. यामुळे सध्या सफरचंदाची खरेदी वाढल्याचे दिसून आले आहे. सोबतच पेरू, डाळिंब, मोसंबी, चिकू आणि केळी यांचीही आवक असल्याचे दिसून येत आहे. फळ बाजारात मोठ्या कालावधीनंतर दर घसरण झाल्याने नागरिकांकडून खरेदीस प्राधान्य दिले जात आहे. बाजारात ड्रॅगनफ्रूटही २०० रुपये दरात मिळत असल्याने त्यालाही पसंती दिली जात आहे.
शहरात परराज्यातील व्यावसायिकांची हजेरी
नंदुरबार : शहरातील विविध भागात परराज्यातून किरकोळ खेळणी, फुगे तसेच गृहपयोगी साहित्य विक्रेते दाखल झाले आहेत. नवरात्रोत्सव झाल्यावर दसरा व दिवाळीत बाजारात विविध वस्तू विक्रीसाठी हे व्यापारी दरवर्षी येतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे यातील काहींनी हजेरी लावली नव्हती. या व्यावसायिकांच्या आरोग्य तपासण्यांबाबत मात्र उदासीनता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
ग्रामीण बसफेऱ्या सुरू
नंदुरबार : तालुक्यातील धानोरा व परिसरातील गावांसाठी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. पासधारक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी या बसेस सर्वाधिक उपयुक्त ठरत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.