आधारकार्ड नोंदणी किंवा त्यात बदल करण्यासाठी प्रकाशा येथील ग्रामस्थांना शहादा, तळोदा, नंदुरबार येथे जावे लागते. त्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय होऊन त्याठिकाणी गर्दीत उभे रहावे लागते. कधी कधी दिवसभर थांबूनही काम होत नसल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा जावे लागते. सद्य:स्थितीत शासकीय कामे, योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश, बँकेचे काम यासाठी आधारकार्ड अनिवार्य झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपले आधारकार्ड अपडेट करीत आहे. प्रकाशा येथे वैजाली, पिसावर, डामरखेडा, करजई, बुपकरी, नांदर्डे, वर्डे-टेंबे, सोनवल, पुनर्वसन आदी २० ते २५ गावांचा दैनंदिन संबंध येतो. प्रकाशासह या गावातील नागरिकांना आधारकार्डच्या कामासाठी बाहेरगावी जावे लागते. गेल्या तीन वर्षांपूर्वी आधारकार्डच्या दुरुस्तीसाठी शहादा येथे गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून येथील तीन-चार बेरोजगार युवकांनी प्रकाशा येथे आधारकार्ड केंद्राला मंजुरी द्यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. प्रकाशा येथे प्रशासनाने आधारकार्ड केंद्राला मंजुरी दिल्यास प्रकाशासह आजूबाजूच्या गावातील नागरिकांची सोय होणार आहे. तसेच बेरोजगार युवकांना रोजगारही उपलब्ध होईल. त्यामुळे येथे आधारकार्ड केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
प्रकाशा येथे आधारकार्ड केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:26 AM