लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गुजरातमधील 12 चाकी ट्रकसह 49 लाखाचा ऐवज प्रकाशा, ता.शहादा येथून चौघांनी पिस्तुलचा धाक दाखवून लंपास केल्याची घटना 30 मार्च रोजी घडली. याबाबत गुरुवार, 4 एप्रिल रोजी रात्री शहादा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.ट्रकचालक आनंद उर्फ पिंडी ओंकार गिरी रा.माजलपूर ( गुजरात) याने शहादा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 18 मार्च रोजी ट्रकने (क्रमांक जी.एल.20 यू-5399) ओरिसा येथे माल नेला होता. 23 मार्च रोजी माल पोहोचवून 24 मार्चला तेथून अॅल्युमिनिअम वायरचा माल घेऊन गुजरातकडे परत येत असताना 30 मार्च रोजी प्रकाशा पासून एक किलोमिटर अंतरावर एका पांढ:या रंगाच्या गाडीने त्याला थांबवले. गाडीतील चौघांनी ट्रकमधे काय माल आहे अशी विचारपूस करून मालाची पावती मागितली. तसेच बोलता बोलता त्यातील एकाने आनंदच्या मानेवर जोरदार मार देऊन त्याला गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले. तसेच त्याच्या खिशातील आठ हजार 500 रुपये रोख व 500 रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून व मारून टाकण्याची धमकी देऊन सुमारे 10 ते 12 तासांचा प्रवास करुन अज्ञातस्थळी घेऊन गेले. तेथून दुस:या दिवशी रात्री पुन्हा गाडीत टाकून धुळे टोलनाक्याजवळ फेकून दिले. तेथून त्याने प्रकाशा गाठले. मात्र तेथे ट्रक आढळून न आल्याने त्याने ट्रकसह 49 लाख 22 हजार 552 रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद शहादा पोलिसात दिली. यात आठ लाखाचा 12 चाकी ट्रक, 41 लाख 13 हजार 552 रुपये किमतीची अॅल्युमिनिअमची तार, आठ हजार 500 रुपये रोख व 500 रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमालाचा समावेश आहे.
प्रकाशानजीक पिस्तुलचा धाक दाखवून ट्रकसह 49 लाखांचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:21 PM