लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे मिशन-100 अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पिकांवर वेळेवर व योग्य प्रमाणात खतांची मात्रा देण्यासाठी ड्रोनद्वारे हवाई फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ड्रोनद्वारे हवाई फवारणीचा हा प्रयोग खान्देशात सातपुडा साखर कारखान्यातर्फे प्रथमच राबविण्यात येत आहे. मेळाव्याला तालुक्यातून शेतकरी उपस्थित होते.शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या आवारात कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. फवारणी करण्यात येणा:या अडचणी, मजुरांची टंचाई यावर मात करण्यासाठी सातपुडा साखर कारखान्याने सुवर्ण महोत्सवी वर्षात कारखान्याचे संस्थापक स्व.पी.के. अण्णा पाटील यांची ‘मिशन 100’ ची स्वप्नपूर्ती करीत ड्रोनद्वारे खतांची हवाई फवारणी करण्याचा अभिनव प्रयोग कारखान्याकडून राबविण्यात येत आहे. ऊस, केळी, पपई, कापूस आदी पिकांवर रोगकिडीचे योग्य नियंत्रण करणे, त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये व खतांची मात्रा वेळेवर देण्यासाठी जमिनीपासून अवघ्या 20 मीटर उंचीवरून फक्त पाच मिनिटात एक एकर क्षेत्रात ड्रोनद्वारे हवाई फवारणी करता येणार आहे. रिमोटद्वारे सुमारे 100 मीटर अंतरावरुन ड्रोनवर नियंत्रण ठेवता येते. याचे प्रात्यक्षिक परिसरातील शेतक:यांना करुन दाखविण्यात आले. या कार्यक्रमात ऊसतज्ञ डॉ.डी.जी. हापसे, डॉ.भरत रासकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, पी.के.अण्णा फाऊंडेशनचे सचिव मकरंद पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील व शेतकरी उपस्थित होते.
ड्रोनद्वारे हवाई फवारणीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:40 PM