नंदुरबार : कोरोनाकाळ व इतर कारणांनी गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले हद्दपारीचे प्रस्ताव अखेर गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी पारित करण्यात आले. एकाच वेळी १९ जणांना हद्दपार करण्याची पहिलीच वेळ ठरली. दरम्यान, गुन्हेगार हद्दपार होत असले तरी त्यांचा जिल्ह्यात वावर कायम असतो. गेल्या काही वर्षात अशा अनेक जणांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे हद्दपारी होते. पण, गुन्हेगार मुक्तपणे पुन्हा जिल्ह्यात येऊन फिरतात, हा विरोधाभास दूर होण्यासाठी उपाययोजना होणेदेखील गरजेचे आहे. या सर्व प्रकाराला जिल्ह्याची भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमांमुळे गुन्हेगारांचे फावते.
n जिल्ह्यात यापूर्वी एकावर एमपीडीएची कारवाई करण्यात आलेली आहे. आता दुसऱ्यावर अशी कारवाई प्रस्तावित आहे.
n अक्कलकुवा येथील संबंधित गुन्हेगार असून, त्याच्यावर २०पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील एमपीडीएची कारवाई झाल्यास अशी कारवाई होणारा जिल्ह्यातील तो दुसरा गुन्हेगार ठरणार आहे.
दोन वर्षात प्रथमच...
n हद्दपारीच्या कारवाई दोन वर्षात प्रथमच करण्यात आल्या. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून कारवाई रखडल्या होत्या, तर इतर कारणांमुळे त्याआधी वर्षभर रखडल्या होत्या. आता हद्दपारीच्या प्रस्तावांना मुहूर्त मिळून १९ जणांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले.
n नंदुरबार शहरापासून तसेच तळोदा, अक्कलकुवा, नवापूर या शहरी भागापासून गुजरातची सीमा दोन ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हद्दपार व्यक्ती गुजरातमधील जवळच्या गावात भाड्याच्या खोलीने राहून आपल्या नातेवाईकांशी नियमित संपर्कात राहतात. शिवाय गुन्हेगारी घडामोडींमध्येदेखील ते सक्रिय राहतात. परिणामी पोलिसांची डोकेदुखी कायम असते.
गेल्या अनेक दिवसांपासून पेंडिंग असलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांवरील धूळ पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जाता जाता झटकली. दुपारी हा प्रस्ताव पारित केला आणि सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाल्याने तोही एक योगायोगच होता.