नंदुरबार : खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात हुकुमशाही, विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवतायत असं म्हणत राहुल गांधींचा सरकारवर टीकेचा बाण सोडला.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी प्रथम होळीच्या शुभेच्छा दिल्या. "आदिवासी आणि काँग्रेसचं नातं दृढ आहे. आदिवासी की वनवासी आपण कोण? प्रश्न विचारत, आदिवासी देशाचे मालक आहात, तुम्हाला भाजप व संघ, वनवासी करून आपल्या पासून जल, जंगल जमिनीचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. वनहक्काचे कायदे करून तुमचा हक्क हिरावला जात आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
"उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं, मनरेगाचे वार्षिक बजेट ६५ हजार कोटी रूपयांचं असतं, २४ वर्षाचं बजेट २२ उद्योगपतींना आंदण दिलं गेलं. विशिष्ट लोक, उद्योगपती देश चालवत आहेत. लोकशाही कुठे आहे, देशात हुकुमशाही आहे. दलित, आदिवासी, इतर मागास यांच्यावर अन्याय केला जात आहे. तसे कायदे केले जात आहे. गुजरातमध्ये आदिवासी, मागास समाजाची २५ टक्के जमीन उद्योगपतींनी अधिग्रहीत केली. या सर्व वर्गाला न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा काढली. जात निहाय जनगणनेचा आग्रह आहेच," असंही ते म्हणाले.