लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गल्ली क्रिकटेपासून दिल्ली क्रिकेट व तेथून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न पाहणारा मेहूल याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ती आवड त्याला आता राष्ट्रीय पातळीवर घेऊन गेली आहे. वयाच्या तेराव्या वर्षी मेहूल याने तालुका क्रिकेट असोसिएशनमार्फत खेळण्यात सुरुवात केली. जिल्हा क्रिकेट संघाकडून विविध गटांत त्याने आपल्या शैलीच्या बळावर सतत सात वर्षे क्रिकेट संघामध्ये स्थान अबाधित ठेवले आहे.
मूळचा पातोंडा, ता.नंदुरबार येथील व सध्या शिरपूर येथे स्थायिक असलेला शेतकरी कुटुृंबातील युवक मेहूल शरद पटेल आपल्या प्रतिभेच्या बळावर थेट महाराष्ट्राच्या संघात स्थान पटकावले आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने नावलौकिक मिळविला असून त्याच्या फलंदाजीच्या बळावर त्याने महाराष्ट्राला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
मेहूलने १९ वर्षांतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे आमंत्रित यांच्या क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत द्विशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्र संघात स्थान पटकावले आहे. त्रिपुरा येथे झालेल्या सामन्यात त्रिपुराविरोधात मुंबई येथे झालेल्या सामन्यात मुंबई विरूद्ध महाराष्ट्र सामन्यात वीस वर्षांआतील सी. के. नायडू करंडक, क्रिकेट अकॅडमीकडून खेळताना त्याने महाराष्ट्र संघाकडून शतकी खेळी करत आंध्र प्रदेश संघाविरुद्ध विजयश्री प्राप्त करून दिली. पुण्यात राजस्थान संघाविरोधात शतक करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. पुणे येथे खेळादरम्यान झालेल्या चार सामन्यांत त्याने ४५० धावा केल्या होत्या.
शेतकरी कुटुंबातील या युवकाच्या खेळाविषयीच्या आवडीला त्याच्या घरच्या लोकांनीदेखील प्रोत्साहन दिले. वडील शरद तुकाराम पाटील यांनी त्याला अभ्यासासोबत खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून नेहमीच मार्गदर्शन केले. घरच्या लोकांच्या पाठबळावरच आपण इथपर्यंत पोहोचल्याचे तो सांगतो.
कोट...
आपण आतापर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळलो आहोत. त्यात विनूमंकड स्पर्धा, रासबिहारी, कर्नल सी. के. नायडू, विजय मर्चंट यासह इतर विविध स्पर्धांचा समावेश आहे. आपली मुख्य मदार ही फलंदाजीवर असून त्याबरोबर क्षेत्ररक्षणातही मेहनत घेतो. मध्यमगती गोलंदाजीही करीत आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूचा मान अनेक स्पर्धांत मिळाला आहे. आता आपले स्वप्न हे राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याचे असून यासाठी आपली कठोर मेहनत सुरू आहे.
-मेहूल शरद पाटील.