लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : ठेक्याअभावी शासकीय आश्रमशाळांमधील विद्याथ्र्याना पुरविण्यात येणारा अंडी, केळी व सफरचंद या पोषक आहाराचा पुरवठा बंद असून, परिणामी साडेतीन महिन्यांपासून आदिवासी विद्यार्थी या आहारापासून वंचित राहिले आहेत. शाळा उघडून तब्बल साडे तीन महिने उलटूनही निविदेच्या प्रक्रियेबाबत संबंधीत आदिवासी विकास विभागाने ठोस कार्यवाही ऐवजी उदासिन भूमिका घेतल्याने आदिवासी पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी निदान लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची अपेक्षा आहे. नंदुरबार अन् तळोदा या प्रकल्पांमध्ये अशी स्थिती आहे.शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्याथ्र्याचे हिमोग्लोबीन, कॅलशीयम वाढीबरोबरच आर्थिक व्हिटॅमीन मिळण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत सन 2012-2013 पासून अंडी, केळी व सफरचंद असा पुरक पोषक आहार फळांच्या स्वरूपात देण्यात येतो. परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा आहार विद्याथ्र्याना देण्यात आलेला नाही. परिणामी आदिवासी मुला-मुलींनाही गेल्या साडेतीन महिन्यांपासून अशा सकस आहारापासून वंचित राहावे लागत आहे. आदिवासी विकास आयुक्तालयांमार्फत ठेक्याची प्रक्रिया राबविली जात असते. या विभागाने ही प्रक्रिया राबविली असल्याचे सांगितले जात असते. तरी निविदेअभावी केळी, अंडी, सफरचंदाचा पुरवठा बंद झालेला आहे. वास्तविक आश्रमशाळा सुरू होवून तब्बल साडेतीन महिने झाले आहेत. आता अर्धे शैक्षणिक वर्ष संपण्याचा मार्गावर आहे, असे असताना अजूनही हा पोषक आहार पुरविण्याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने पालकांनी आदिवासी विकास विभागाच्या उदासिन धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालये या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत आहेत. कुठे भौतिक सुविधेचा प्रश्न, कुठे विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती, इंग्रजी शाळा, प्रवेशाचा प्रश्न असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. पुरक पोषण आहाराने यात भर घातली आहे. शासनाने याप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मकता दाखविणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आहे. एकीकडे आदिवासींच्या विकासासाठी करोडो रुपये खर्च होत असल्याचा दावा केला जातो तर दुसरीकडे त्यांना योजनेपासून उपेक्षित ठेवले जात असल्याचे विदारक चित्र आहे. निदान आश्रमीय विद्याथ्र्याच्या या समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी तरी शासनाकडे पाठपुरावा करण्याची पालकांची मागणी आहे.सोलर फ्रिजर ठरणार शोभेचेपूरक पोषक आहाराची अंडी, केळी आणि सफरचंद हे खाद्यपदार्थ नाशवंत आहेत. त्यामुळे ती खराब होऊ नये म्हणून शासनाने प्रत्येक आश्रमशाळेला महागडे सोलर फ्रीज नुकतेच पुरवले आहे. परंतु हे फ्रीज सध्या तरी शोभेचेच ठरले आहे. कारण त्यात ठेवण्यात येणारी अंडी, केळी, सफरचंद या खाद्य पदार्थाचा शाळांना पुरवठा बंद आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाने आधी थांबलेला हा पुरवठा पूर्ववत करण्याची आवश्यकता असताना त्याबाबत दुर्लक्ष केले आहे.
पोषक आहारापासून विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:52 PM