राधेश्याम कुलथे । ब्राrाणपुरी : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुरू करण्यात आले. मात्र आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिका:यांसह इतर कर्मचा:यांची अनेक पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील आरोग्य सेवा ‘ऑक्सिजन’वर असल्याचे सध्याचे चित्र आहे.शहादा तालुक्यात एकूण 12 प्राथमिक आरोग्य केंद्र व 63 उपकेंद्र आहेत. त्यात आरोग्य सेवकांची (एम.पी.डब्ल्यू.) 81 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 38 पदे वर्षभरापासून रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. शहादा तालुक्यात आदिवासी लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात आहे . दुर्गम भागातील नागरिक आरोग्याच्या सोयी-सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी रिक्त पदे भरण्याची गरज आहे. शहादा तालुक्यातील आडगाव, प्रकाशा, सारंगखेडा, कहाटूळ, सुलवाडा, कलसाडी, वडाळी, वाघर्डे, कुसुमवाडा, शहाणा, मंदाणे, पाडळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 27 वैद्यकीय अधिका:यांची पदे मंजूर असून त्यापैकी 5 पदे रिक्त आहे. जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत त्यांच्याकडे इतर आरोग्य केंद्रांचा कार्यभार असल्याने त्यांना रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे शहादा तालुक्यातील गरजू रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे.शहादा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिका:यांसह इतर कर्मचा:यांची पदे रिक्त असल्याने गरजू व गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाही. परिणामी या रुग्णांना आरोग्य केंद्रातून परतावे लागते. नाईलाजाने खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावे लागतात. त्यामुळे डॉक्टरांची फी व औषधांचा खर्च करावा लागतो. शासनाने सुरू केलेले आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतून वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने व आर्थिक भरुदड बसत असल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
शहाद्यात आरोग्य सेवा ‘ऑक्सिजन’वर आल्याने रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:58 AM