प्रकाशा ग्रामपंचायतीने गोमाई नदीजवळ विद्युत रोषणाई, फोकस लावले होते. त्यामुळे गोमाई नदीपूल व घाटावर उजेड पडला होता. सायंकाळी सात ते रात्री १० पर्यंत विसर्जन सुरू होते. या विद्युत रोषणाईचा फायदा गणेश मंडळांना झाला. तसेच ग्रामपंचायत कर्मचारीही रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी थांबून होते.
पुढच्या वर्षी १० दिवस लवकर आगमन
गणरायाला निरोप देताना आपण म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ही भक्तांची मागणी गणरायाने मान्य केली असून, पुढच्या वर्षी बाप्पा १० दिवस लवकर म्हणजे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी येणार आहेत.
गौतमेश्वर मंदिराला आले यात्रेचे स्वरूप
केदारेश्वर मंदिर, तापी घाटावर गणपती विसर्जनाला बंदी होती. त्यामुळे सर्वच मंडळांचे गणपती गौतमेश्वर मंदिर परिसरात आले होते. अनंत चतुर्दशीला सकाळपासूनच भाविकांनी गणेश विसर्जनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे या ठिकाणी जणुकाही यात्रेचे स्वरूप आले होते. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते. यावेळी कोणी झांज घेऊन तर कोणी हरे राम हरे रामचा जप करताना दिसले.