लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदाच्या पावसाळ्यात किंवा कोरोना काळात मोठी नैसर्गिक आपत्ती आली नसल्याने यंदा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आरामच राहिला. असे असले तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस दलाचे आपत्ती व्यवस्थापन पथक दक्ष होते. आवश्यक त्या सर्व सुविधा त्यांना पुरविण्यात आल्या होत्या.नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा पूरस्थिती निर्माण झाली नव्हती. इमारती किंवा घराच्या पडझडी देखील झाल्या नव्हत्या. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला पाहिजे तसे कामच यंदा मिळाले नाही. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि दोन वेळा नवापूर आणि शहादा तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा कस लागला होता. यंदा देखील त्या दृष्टीने या कक्षाने सर्व तयारी करून ठेवली होती. लाईफ जॅकेट, लॉईफ टॉर्च, नाईट लॅम्प, रबरी बोटी यासह इतर साहित्यासह कर्मचारी सज्ज होते. त्यासाठी २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवण्यात आला होता.परंतु यंदा पावसाळ्याचे दोन महिने जेमतेम पावसाचे राहिले. नंतरचे दोन महिने पाऊस झाला, मात्र तो काही भागात अतिवृष्टीचा तर काही भागात कमी राहिला. त्यामुळे आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली नाही. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भावात देखील आपत्ती व्यवस्थापनाला धावून जावे लागेल अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली नव्हती.महसूल विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह जिल्हा पोलीस दलाचे आपत्ती व्यवस्थापन दल देखील जिल्ह्यात सक्रीय असते. या दलात प्रशिक्षीत पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना वेळोवेळी नवनवीन प्रशिक्षण देखील दिले जात असते. या दलाकडे देखील अत्याधुनिक साहित्य सामुग्री उपलब्ध आहे. यंदा या दलाला देखील कुठे धावून जाण्याची गरज पडली नाही.
आपत्ती व्यवस्थापनाचे काम यंदा सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:39 PM