लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वन जमिनीवर अतिक्रमणाच्या उद्देशातून वनमजुराचा खून झाल्याची घटना 14 रोजी घडली होती. पोलिसांनी 24 तासात गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. खोलघर, ता.नंदुरबार परिसरात सामाजिक वनीकरण विभागात हंगामी रोजंदारी वनमजुर म्हणून सुभाष पाचीराम ठाकरे (45) रा.तलावपाडा, ता.नंदुरबार कार्यरत होते. 14 रोजी सोनारबारी टेकडीवर जंगलात दुपारी त्यांची हत्या करण्यात आली होती. तिक्ष्ण हत्याराने मारून व गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाल्यावर विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांनीही समांतर तपास सुरू केला. तांत्रिक वेिषण, घटनास्थळावरील पुरावे यांची सांगड घालून ढेकवद, ता.नंदुरबार येथील दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करण्याच्या इराद्याने स्थानिक वन कामगारांना हाताशी धरून हा गुन्हा केल्याचे समोर येत आहे. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व विसरवाडी पोलिसांनी ही कामगिरी केली.
खोलघरच्या खुनाच्या गुन्ह्याची 24 तासात उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 9:14 PM