नंदुरबार : बदलती जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा अस्त आणि वाढत जाणाऱ्या अपेक्षा यामुळे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद कमी होताना दिसत नाहीत. किरकोळ वादात दोन्ही बाजूकडून ताणून धरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी पोलीस दलातील भरोसा सेलमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न होतो. त्यात चांगले यशही मिळते, पण काही प्रकरणात थेट गुन्हे दाखल होत असल्याचे चित्र आहे.
अगदी क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये संघर्ष सुरू होत असतो. त्यातून त्यांच्यात हाणामारीपर्यंत वेळ येते. काही दिवस दोघांचा अबोला असतो. माघार घेणार कोण, असा मुद्दा पुढे आल्यानंतर, आम्हाला सोबत राहायचेच नाही, इथंपर्यंत त्यांची गोष्ट येते. हे प्रकरण भरोसा सेलमध्ये आल्यानंतर दोघांचेही समुपदेशन केले जाते. सेलच्या प्रयत्नांना काही वेळेस यश येते. सेलमधील कर्मचारी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वाद अगदीच विकोपाला गेलेले असल्यामुळे नाईलाजाने गुन्हे दाखल होतात. इगो दुखावतो आणि वाद वाढतात...
n आजकाल एकत्र कुटुंब पद्धत नसल्यामुळे घरात कुणी ज्येष्ठ मंडळी नसतात. अशावेळी पती-पत्नीत वाद झाला, तर त्यांना समजाविण्यासाठी कुणी नसते. अशावेळी दोघांपैकी कोणीच माघार घेत नाही आणि वाद वाढत जातो. परिणामी कुटुंब दुभंगण्यापर्यंत वाद जातो. त्यामुळे दोघांपैकी एकाने इगो बाजूला ठेवून समंजसपणा दाखवला, तर तुटणारे संसार वाचतील. अगदी किरकोळ वादाचे स्वरूप हे पोलीस ठाण्यापर्यंत जाते.
समंजसपणा दाखवा
n घरात, कुटुंबात वाद झाला, तर तो अंतर्गत मिटवा. एकमेकांमध्ये समंजसपणा दाखविणे आवश्यक आहे.
n काही वेळा विवाहितेला पैशासाठी, माहेरून वस्तू आणण्यासाठी त्रास दिला जातो. अशाबाबतीत गुन्हे दाखल होतात.
n यासाठी हुंडाविरोधी कायदा सक्षम आणि शिक्षेच्यादृष्टीने पुरेसा आहे. याबाबत कुटुंबामध्ये सुसंवाद आवश्यक आहे.
प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे भरोसा सेल
n जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात महिला सेल अर्थात भरोसा सेल हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. यात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आलेल्या अर्जानंतर दोन्ही बाजूकडील मंडळींना बोलावून समुपदेशन केले जाते व समजाविण्याचा प्रयत्न होतो.