लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नर्मदा काठच्या गावांमध्ये प्रशासनाच्यावतीने नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांच्या सीमेलगत नर्मदा काठावर अतिदुर्गम भागात भूषा, उडद्या, भादल, भाबरी आदी गावांमध्ये धडगावचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या उपस्थितीत शासनाच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे या भागात पहिल्यांदाच प्रशासन पोहोचले आहे. धडगाव तालुक्यातील हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे येथे दळणवळणाची सोय नाही परिणामी या भागात अभावानेच प्रशासन पोहोचते. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने त्यांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. बहुतांश गावांमध्ये जाण्यासाठी बोटीने जावे लागते. सरदार सरोवर प्रकल्पातील बाधित अनेक प्रकल्पग्रस्त या भागात अद्यापही वास्तव्यास आहेत. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंसोबत औषधोपचाराचे साहित्य दिले आहे.
नर्मदा काठावरील गावांमध्ये धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:17 PM