लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेल्या जिल्ह्यात आता जंगल नष्ट होत असून त्यामुळे पर्यावरणाचा :हास होत आहे. अशा स्थितीत शहादा येथील हैदरअली नुरानी यांनी वृक्ष लागवडीची चळवळ रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. गेल्या 25 वर्षापासून त्यांनी अविरत हा प्रयोग राबवला असून आतार्पयत सुमारे एक लाखाहून अधिक रोपे त्यांनी वाटप केली आहेत.हैदरअली नुरानी हे विविध सामाजिक उपक्रम राबवीत असून त्यात पर्यावरण जागृतीसाठी त्यांचे प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. त्यांचे निवासस्थान म्हणजे एखादी रोपवाटिकाच. बाराही महिने त्यांच्या निवासस्थानाच्या आवारात विविध वृक्षांची रोपे ठेवलेली असतात. पावसाळ्यात ते विविध गावी जाऊन लोकांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहीत करतात. त्यांच्या या पर्यावरण प्रेमामुळे शहाद्यापासून जवळच असलेल्या उंटावद शिवारात वृक्षांची एक अनोखी बाग तयार झाली आहे. पाच एकर क्षेत्रात त्यांनी फुलवलेले हे नंदनवन परिसरातीलच नव्हे तर जिल्हाभरातील लोकांसाठी पर्यटनाचे केंद्र बनले आहे. शहादा शहरातील विविध वसाहतींमध्ये त्यांनी रोपांचे वाटप करून लोकांकडून त्याची लागवड करून घेतली आहे. मध्यंतरी पाणीटंचाईच्या काळात त्यांनी लोकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच वृक्ष जगविण्यासाठीही टँकर लावून पाणी वाटप केले. शहरातील दुभाजकांमध्येही त्यांनी रोपांची लागवड केली आहे. विविध ठिकाणी त्यांनी वृक्षांच्या बागा फुलवल्या आहेत. यावर्षी सुरत येथील जगदीश पटेल या युवकाच्या मदतीने गेल्या दोन महिन्यात त्यांनी परिसरात जवळपास दोन हजारापेक्षा अधिक रोपांची लागवड केली आहे. कडूनिंब, वड, औदुंबर, पिंपळ या वृक्षांच्या लागवडीला ते प्राधान्य देतात.वृक्षलागवडी संदर्भातील त्यांच्या कार्याची दखल वनविभागानेही घेऊन त्यांना पर्यावरणप्रेमी म्हणून गौरविले आहे. पर्यावरण क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पर्यावरण संदर्भात लोकांमध्ये त्यांनी सुरू केलेले प्रयोग जनतेत कौतुकाचे ठरत आहेत.
25 वर्षात वृक्ष लागवडीसाठी ‘त्यांनी’ केले एक लाख रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:14 AM