लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पालिकेमार्फत शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केली. प्रशासनाकडून विविध विभागांची माहिती घेत समस्या जाणून घेतल्या व विकास कामे करताना त्याचा दर्जा योग्य असावा, दुजाभाव नसावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी गुरुवारी शहादा पालिकेला भेट दिली. या वेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, नगरसेवक व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. पालिकेच्या विकास कामांचा आढावा घेताना प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांना शहराची हद्द वाढविण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे कवळीथ, ता.शहादा येथील ब्रिटिशकालीन बंधाºयातून शहराच्या हद्दीतील वाहणाºया पाटचाºया पालिकेच्या ताब्यात देण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेमार्फत करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी केली. यात प्रामुख्याने लोकमान्य टिळक टाऊन हॉल व महात्मा गांधी उद्यानाचा समावेश होता. शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. अतिक्रमण काढताना कुठलीही हयगय व दुजाभाव करू नका व अतिक्रमण काढताना कोणीही विरोध केल्यास अशांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी जुन्या तहसील कार्यालय इमारतीची पाहणी केली. तहसील कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले असल्याने गेल्या सहा महिन्यापासून ही इमारत बंद अवस्थेत होती. याठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय सुरु करण्याची मागणी प्रांताधिकाºयां मार्फत करण्यात आली. या इमारतीची डागडूजी करण्यात यावी व प्रांताधिकारी कार्यालय सुरू केले जाईल, डॉ.भारूड यांनी सांगितले. या इमारतीची पाहणी करताना तहसीलदारांच्या दालनात ईव्हीएम मशीन कुठल्याही सुरक्षिततेविना ठेवण्यात आल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रांताधिकारी गिरासे यांना या मशिनी सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले. शहरातील मध्यवर्ती भागात बसस्थानक असल्याने या परिसरात वाहतुकीची समस्या सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी शहादा बस आगाराला भेट दिली. बसस्थानक स्थलांतरित करण्यास का विलंब होत आहे यास कोणाचा विरोध आहे याबाबतची माहिती जाणून घेतली याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डॉ.भारुड यांनी यावेळी दिली.
शहाद्यातील विकास कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 1:04 PM