लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात सायबर चोर सक्रीय झाले असतांना, कोरोना संदर्भात विविध अफवा व तेढ निर्माण करण्याचे प्रकार सोशल मिडियावर सुरू असतांना नंदुरबार मात्र त्यापासून ‘सेफ झोन’मध्ये असल्याचे चित्र आहे. २२ मार्चपासून आतापर्यंत केवळ दोनच सायबर क्राईमचे गुन्हे दाखल झाले आहेत.लोकांच्या घरी बसण्याचा फायदा, इंटरनेट व सोशल मिडिया वापरण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता लॉकडाऊनच्या काळात सायबर चोरटे सक्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसात राज्य व देशात आॅनलाईन फसवणूक व इतर बाबींचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. परंतु नंदुरबार त्यापासून दूर असल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे सोशल मिडियाद्वारे कोरोना संदर्भात अफवा पसरविणे, कोरोना संशयीत रुग्णाची कागदपत्रे सार्वजनिक करणे, जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीेने मेसेज व्हायरल करणे, प्रशासनाच्या उपाययोजनांना तडा जाईल अशा पद्धतीने चुकीची माहिती प्रसारित करणे आदी प्रकारचे सायबर गुन्हे गेल्या काळात वाढले होते. परंतु पोलिसांनी अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, व्हॉट्सअप गृपच्या अॅडमीनला जबाबदार धरणे आदी प्रकारच्या कारवाई सुरू केल्याने जिल्ह्यात या गुन्ह्यांवरही मर्यादा आली.अनेक गृप अॅडमीन यांनी सेटींग बदलून व्हॉट्सअप गृपवरील मेसेज नियंत्रणात आणले. परिणामी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात अवघ्या दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत व्हॉट्सअपवरील एक आणि फेसबूकवरील एक अशा दोन मेसेजमुळे गुन्हे दाखल झाले आहेत.पहिला गुन्हा जळगाव येथील कोरोना रुग्णाचे कागदपत्र व्हॉट्सअप गृपवर शेअर केल्याने नंदुरबारातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दुसरा गुन्हा फेसबूकवर आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती केल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सायबर क्राईमबाबत जिल्हा ‘सेफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:57 AM