याबाबत माहिती देताना सीईओ गावडे यांनी सांगितले, जिल्हा हगणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर १०० टक्के शौचालयाचा वापर होणे आवश्यक आहे. तसेच शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय किंवा शासकीय कार्यालयांमध्ये शौचालय उपलब्धता व त्याचा नियमित वापर आवश्यक आहे. गावस्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आवश्यक आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये शौचालयांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. तसेच ज्या कुटुंबांकडे शौचालय उपलब्ध नाही त्यांनाही भविष्यात शौचालय उपलब्ध करून देण्याचे शासनाचे नियोजन आहे. मात्र ज्या कुटुंबधारकांकडे शौचालय उपलब्ध असूनही त्यांचा वापर होताना दिसून येत नाही.
परिसर गाव व परिसर स्वच्छ राहण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शौचालय वापराबाबत ग्रामस्थांना सक्ती करावी. शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहनही रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात गाव परिसराची स्वच्छता कायम राहावे, यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे गाव कृती आराखडा तयार करण्याची कामे सुरू आहेत. याबाबत सामाजिक संस्था व तालुकास्तरावरील गट संसाधन केंद्राचे कर्मचारी यांचेमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षण वेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून गाव कृती आराखड्यात सांडपाणी व घनकचरा यांचे योग्य रीतीने नियोजन होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांना केले आहे.