लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जानेवारी रोजी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी 25 कलाप्रकारांचे सादरीकरण करणार आहेत.एकदिवसीय नंदुरबार जिल्हा युवक महोत्सवाची प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी संस्थेचे शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, उपप्राचार्य तथा आयोजन समितीचे प्रमुख डॉ.एम.के. पटेल उपस्थित होते. ‘युवक महोत्सव 2018’चे उद्घाटन 29 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक पी.आर. पाटील, प्राचार्य मकरंद पाटील यांची उपस्थिती राहील. या युवा महोत्सवासाठी महाविद्यालयातर्फे जय्यत तयारी करण्यात येत असून त्यासाठी विविध समिती गठीत करण्यात आल्या आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलगिAत 29 महाविद्यालयांचे 486 कलाकार विद्यार्थी 25 कला प्रकारांचे सादरीकरण करतील. पाच वेगवेगळ्या मंचावर कार्यक्रम सादर केले जाणार असून रंगमंच क्रमांक एक हा सूक्ष्मजीवशास्त्र प्रांगणात राहणार आहे. याठिकाणी विडंबन नाटय़, मूकनाटय़, मिमिक्री, समूह लोकनृत्याचे सादरीकरण होईल. महात्मा गांधी सभागृहातील रंगमंच क्रमांक दोनवर भारतीय लोकगीते, सुगम गायन, समूह गीत, लोकसंगीत, पाश्चात्य सुगम गायनाचे सादरीकरण होईल. वामय भवनातील कक्ष क्रमांक 201 मध्ये रंगमंच क्रमांक तीनवर काव्यवाचन, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा होतील. रंगमंच क्रमांक चार सरविश्वेश्वरैया सभागृह अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राहणार असून तेथे शास्त्रीय गायन, वादन, सूरवाद्य, नृत्य, पाश्चात्य समूहगीतांचे सादरीकरण होईल. सरदार पटेल सभागृहातील रंगमंच क्रमांक पाचवर रांगोळी, फोटोग्राफी, ईस्टॉलेशन, व्यंगचित्र, स्पॉट पेंटींग, चित्रकला, प्ले मॉडेलिंग, कोलाज या कलाप्रकारांच्या स्पर्धा होतील, अशी माहिती प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी दिली.
शहादा महाविद्यालयात रंगणार जिल्हा युवक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:24 PM