नंदुरबार: तालुक्यातील नळवा येथे हळदीच्या कार्यक्रमात मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्या दोघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री १० वाजेनंतर मोठ्या आवाजात वाद्य वाजविण्यास मनाई आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम किंवा विवाह समारंभांमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात वाद्य वाजविली जातात. नंदुरबारनजीक असलेल्या नळवे गावातदेखील एका विवाह समारंभातील हळदीच्या कार्यक्रमात मध्यरात्रीनंतरही मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात होता.
ही बाब पोलिसांना कळल्यावर पोलिसांचे पथक गावात गेले. त्या ठिकाणी मध्यरात्रीनंतर १ वाजता मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून अर्थात डीजे वाजवून काहीजण नाचताना आढळून आले. याबाबत त्यांनी रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे पोलिस कर्मचारी चेतन मोरे यांनी फिर्याद दिल्याने वीरभान खुबा चव्हाण (४५, रा. नळवे खुर्द) व ऋतीक विदेश वसावे (२३, रा. धानोरा, ता. नंदुरबार) यांच्याविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात विनापरवाना वाद्य वाजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस जमादार पानाजी वसावे करीत आहेत.