लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : खर्चिक रूढीपरंपरांना फाटा तळोदा येथील चव्हाण बंधूंनी वडिलांच्या दशक्रियेसाठी येणारा खर्च माळी समाजाच्या विकासाला देत नवा आदर्श घालून दिला आह़े त्यांच्या या निर्णयाचे समाजातून स्वागत करण्यात येत आह़े तळोदा येथील माळी समाजातील ज्येष्ठ नामदेव शंकर चव्हाण (85) यांचे 4 फेब्रुवारी रोजी निधन झाले होत़े त्यांच्या निधनानंतर सुदाम चव्हाण, मधुकर चव्हाण, राजेंद्र चव्हाण या तिन्ही मुलांनी वडिलांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी काम करण्याचा निर्णय घेत, 11 दिवसांऐवजी सात दिवसांचे उत्तरकार्य आणि अनिष्ट परंपरा व रूढींना टाळून समाजाच्या हितासाठी 31 हजार 111 रुपयांची देणगी मान्यवरांच्या हातात दिली़ तिघा भावांच्या या निर्णयाला त्यांच्या पत्नी आणि मुलांनी पाठिंबा दिला आह़े तळोदा शहरात माळी समाज बांधवांची मोठी संख्या आह़े समाजातील अनेकांना शिक्षण व रोजगारासाठी झगडावे लागत़े अडीअडचणीच्या वेळी उधार-उसनवार करून कर्जाचा बोजा सहन करावा लागतो़ यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आह़े यावर मार्ग काढण्यासाठी माळी समाजमंडळाच्या माध्यमातून मदतीचा उपक्रम सुरू आह़े समाजाचे अध्यक्ष ईश्वरलाल मगरे, उपाध्यक्ष विनायक माळी, सचिव मित्तलकुमार टवाळे, भगवान मगरे, अनिल माळी, सुरेश चव्हाण, पंकज मगरे, भिका मगरे यांच्याकडे ही रक्कम देण्यात आली़
उत्तरकार्याचा खर्च समाजाला देणगी : तळोदा येथील चव्हाण बंधूंचे दातृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:09 PM