- रमाकांत पाटीलनंदुरबार : ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावीत यांनी मंगळवारी चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अपक्षापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. या पक्षात त्यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.
राजकारणाचा मोठा वारसा असलेल्या डॉ.विजयकुमार गावीत यांनी शासकीय नोकरी सोडून १९९५ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी त्यावेळी पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राज्यातील तत्कालिन भाजप-शिवसेना युती सरकारला त्यांनी पाठींबा दिला होता. विशेषत: नंदुरबार जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा केला. त्याचदरम्यान त्यांना युती सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाले आणि पुढे काही दिवसातच जिल्ह्याची निर्मितीही झाली. त्यामुळे जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
१९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्या पक्षातर्फे निवडणूक लढवली. त्यावेळीही ते मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी झाले आणि आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यांना आदिवासी विकास विभाग खाते मिळाले होते. त्या माध्यमातून त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला. त्यांची कारकीर्द पुढे वादातीतही ठरली. पण आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्याच कामाच्या बळावर २००९ मध्ये देखील ते विधानसभा निवडणूक जिंकले आणि पुन्हा तिसऱ्यांदा मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन आणि पर्यटन विभागाची जबाबदारी सांभाळली.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या डॉ.हीना गावीत यांना भाजपतर्फे लोकसभेची उमेदवारी मिळाली व त्या निवडूनही आल्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ.गावीत यांनीही भाजपतर्फे उमेदवारी केली. सलग पाचव्यांदा ते विजयी झाले. पण तेव्हा मात्र त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. २०१९ मध्येही सलग सहाव्यांदा झाले. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. आता भाजप व शिवसेना शिंदे गटाचे युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना चौथ्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.