नंदुरबार : शहरातील विविध भागांत मोकाट गुरांची समस्या जीवघेणी बनली आहे. रस्त्यात बसून राहणाऱ्या गुरांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. पालिकेने वारंवार सूचित करूनही गुरे मालक त्यांना बांधून ठेवत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर गुरे माेकाटपणे बसून राहात असल्याने, वाहतुकीची कोंडीही होत आहे. रस्त्यात बसून असलेली जनावरे सहजपणे बाजूला होत नसल्याने, नागरिकांना मार्ग बदलावा लागत असल्याचे चित्र अनेक वेळा दिसून येत आहे. कचरा, कागद, रस्त्याच्या काठावर पडलेले शिळे पदार्थ खाऊन जगणारी बहुतांश जनावरे ही हिरवा चारा खाऊच शकत नसल्याचेही दिसून आले आहे.
मोकाट जनावरांचा वाली कोण...?
नंदुरबार शहरात फिरणारी सुमारे १०० पेक्षा अधिक जनावरे ही एकाच व्यक्तीची असल्याची माहिती आहे. त्यानंतर, कमी अधिक संख्येने गुरांचे मालक आहेत. मुबलक चारा मिळत नसल्याने, तसेच शहरी भागात हिरवा चारा मिळत नसल्याने, त्यांच्याकडून गुरांचे संगोपन करण्याऐवजी माेकाट सोडून देण्यात आल्याने त्यांना वालीच उरलेला नाही.
पुन्हा कारवाई करू
दरम्यान, याबाबत नंदुरबार पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, मोकाट गुरांबाबत त्यांच्या मालकांना समज देण्यात आली आहे. जनावरे घराजवळ बांधावीत, असे सांगितले होते. येत्या काळात गुरे कोंडवाड्यात टाकण्याची कार्यवाही करावी लागेल, अशा तक्रारी शहरातून होत असल्याचे सांगितले.
सतत कारवाई
नंदुरबार नगरपालिकेकडून मोकाट गुरांची समस्या मार्गी लागावी, यासाठी मालकांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. यातून गुरांना बांधून न ठेवणाऱ्यांची गुरे कोंडवाड्यात टाकण्यात आली होती. यानंतरही संबंधितांवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे वेळाेवेळी समोर येत आहे.
या मार्गावर जपून...
नेहरू चाैक ते नगरपालिका चाैक
उड्डाणपूल
गिरीविहार परिसर
कोरीट रोड
जळका बाजार ते सोनार खुंट
साक्री नाका परिसरात
तळोदा रोड