लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या दुकानांलगत बेशिस्तपणे वाहने उभे राहत असल्याने बसस्थानकातून बस काढताना चालकाला अवघड जाते. यातून बऱ्याचवेळा चालक व नागरिक यांच्यात बाचाबाची होऊन वादही होत आहेत. जुने तहसील कार्यालयापासून तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लावण्यात येणाºया बेशिस्तपणे व बेकायदेशीर वाहने लावणाºया चालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.शहादा शहरात गेल्या महिन्यात नगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढले आहे. अतिक्रमणे काढल्याने रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला होता. मात्र काही दिवसातच हातगाडीवर वस्तू विक्रेत्यांनी रस्त्यावर कब्जा केला आहे. याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकही मोकळा रस्ता दिसल्यास दिसेल त्या जागेवर वाहन लावून आपल्या कामासाठी निघून जातात. शहरात मुख्य बाजारपेठ एकच असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत पादचारी व वाहनांची वर्दळ असते. महात्मा गांधी पुतळा ते जुने तहसील कार्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत दिवसभर वर्दळ असते. अतिक्रमण काढल्याने रस्ता मोकळा होऊन वाहतूक सुरळीत होईल, असे नागरिकांना वाटले होते. मात्र पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.दोन दिवसांपूर्वी सकाळी आठ वाजेच्या सुमारास म्हसावदकडे जाणारी शहादा आगारातून निघालेली बस वळण घेत असताना जड वाहन समोर उभे असल्याने वाहन चालकाला ती बस काढता आली नाही. १० ते १५ मिनिटे बस जागेवरच उभी राहिल्याने इतर बसेसही खोळंबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या कर्कश हॉर्नमुुळे त्रास सहन करावा लागला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना नेमलेल्या पॉर्इंटवर हजर राहण्याची सक्त ताकीद दिली तर वाहतुकीला निश्चित शिस्त लागू शकते. मात्र काही कर्मचाºयांकडून कर्तव्यात कसूर होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.