नंदुरबार : बंदोबस्तासाठी बाहेर गावाहून आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाचव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीप्रसंगी गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने संतप्त गणेश भक्तांनी रविवारी प्रकाशा दूरक्षेत्राच्या ठिकाणी ठिय्या मांडला होता. अखेर पोलिस निरिक्षकांनी त्यांची समजूत घातल्यानंतर तणाव निवळला. प्रकाशा येथे दरवर्षी शांततेत गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदादेखील शांततेत उत्सव साजरा केला जात आहे. मूर्ती विसर्जनासाठी बाहेरगावची मंडळे मोठ्या संख्येने येत असतात, त्यांनाही ग्रामस्थ सहकार्य करीत असतात; परंतु शनिवारी मात्र शांतताप्रिय गणेशभक्तांना बाहेरून आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी छळले. शनिवारी पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.
रात्री १० वाजेपर्यंत मिरवणुका आटोपाव्या अशा सूचना किंवा जबरदस्ती करीत काही पोलिस अधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चुकीची वागणूक दिली. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत होते; परंतु अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे मंडळांनीही नमती भूमिका घेत वेळेत विसर्जन मिरवणुका पार पाडल्या. रविवारी सकाळी मात्र त्यांच्यातील नाराजीची भावना उफाळून आली आणि शेकडो जण प्रकाशा पोलिस दूरक्षेत्र कार्यालयात जमले. लागलीच शहादा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, फौजदार पाटील हे दाखल झाले. उपस्थितांनी रात्रीच्या प्रकाराबाबत माहिती देत नाराजी व्यक्त केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी याबाबत माहिती घेऊन चौकशी करतो. कुणीही नाराज होऊ नका, प्रकाशा गाव शांतताप्रिय आणि इतरांना सहकार्य करणारे असल्याचे सांगितले. सातव्या दिवसाच्या मिरवणुकांच्या वेळी आपण स्वत: येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थितांचा रोष कमी झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, हरी दत्तू पाटील, पंचायत समिती सदस्य जंग्याभाऊ भील, ग्रामपंचायत सदस्य अरुण भील, माजी सरपंच भावडू ठाकरे, रफिक खाटीक, नंदकिशोर पटेल, पंडित धनराळे आदींसह सामाजिक कार्यकर्ते गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.