नंदुरबार : सातत्याने वाढणारे खाद्यतेलाचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर हे दर कमी झाले असल्याने, गृहिणींचे किचन मॅनेजमेंट काही अंशी स्थिर राहण्याची शक्यता आहे. सोयाबीनसह सर्व प्रकारची खाद्यतेले १० रुपयांपर्यंत स्वस्त झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
घराघरात तयार केल्या जाणाऱ्या रुचकर स्वयंपाकासाठी तेल हा अविभाज्य घटक असतो. घरोघरी दर महिन्याला होणाऱ्या किचन मॅनेजमेंटमध्ये सर्वात वरचा क्रमांक तेलाने पटकावला आहे. यातून तेलाचा खर्च किती व कसा करावा, याचे गणित गृहिणींकडून जुळविले जात होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून प्रतिकिलो १०० रुपयांच्या आत असलेले खाद्यतेल शंभरी पार गेले होते. सोबत इतर वस्तू महागल्याने किराणा करताना तेलात कपात करण्याची वेळही काहींवर आली होती. गरज तेवढीच खरेदी करण्यावर गृहिणी भर देत होत्या. यात तोंडावर दिवाळीसण आल्याने कपातीचे धोरण अवलंबवावे लागण्याची शक्यता अधिक होती. दरम्यान, किरकोळ बाजारात तेलाचे दर १० रुपयांनी कमी झाले असल्याने, तेलाचे बजेट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वच प्रकारच्या तेलाचे दर हे कमी झाले असल्याने, येत्या काळात त्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाजारात मात्र तेलाचे दर वाढल्यानंतरही गरज तेवढीच खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या काळातही गृहिणी याच पद्धतीने तेलाची खरेदी करणार असल्याने बाजारात फरक पडणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
...म्हणून दर झाले कमी
शासनाने तेलावरचा अधिकचा कर कमी केल्याने दरांमध्ये कपात झाल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु हे दर नेमके किती दिवस स्थिर राहतील, हे सांगता येणे शक्य नाही, परंतु यामुळे बाजारात तेलाची खरेदी वाढली आहे.
- नीलेश चाैधरी, व्यापारी.
महागाईमुळे किराणा यादीत कपातीचे धोरण अवलंबले होते. महिन्याला चार ते पाच किलो तेल हे लागतेच, त्यात कपात करणे शक्य होत नाही. दर कमी झाल्याने वाढीव खरेदी करता येणे शक्य आहे.
- कुसूमबाई माळी, गृहिणी.
वाढती महागाई चिंतेचा विषय आहे. तेलाचे दर १० रुपयांनी कमी झाल्याचाही दिलासा आहे. यातून सणासुदीच्या काळात दर कमी झाल्याने सर्वांनाच फायद्याचे ठरणार आहे.
- कामिनी पटेल, गृहिणी.