लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे 2 नोव्हेंबर रोजी एक दिवशीय शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय संघाची बैठक शनिवारी पथराई येथील सैनिकी विद्यालयात झाली. मुख्याध्यापक संघानेही पाठींबा दिला आहे.बैठकीला राजेंद्रकुमार गावीत, मोतिलाल पाटील, मनोज रघुवंशी, प्रा.मकरंद पाटील, श्रीपत पाटील सुहास नटावदकर, अभिजीत पाटील, प्रा.एल.एस.सैय्यद, यशवंत पाटील, भास्कर पाटील आदी उपस्थित होते. श्रीपत पाटील, मोतीलाल पाटील, राजेंद्रकुमार गावीत यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण संस्था चालकांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून महामंडळाच्या अंतर्गत पाठपुरावा सुरू आहे. आंदोलनेही झाली, परंतु शासनाने मागण्यांबाबत काहीही हालचाल केली नाही. ही बाब लक्षात घेता आता पुन्हा एक दिवशीय शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. संस्था चालकांच्या मागण्यांमध्ये 20 टक्के अनुदानीत शिक्षकांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान द्यावे. अघोषीत शाळा वर्ग, तुकडय़ा व महाविद्यालयांना तात्काळ निधीसह घोषीत करावे. ऑक्टोबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही जुनीच पेन्शन योजना लागू करावी. सातवा वेतन आयोग लागू करावा. शिपाई भरती सुरू करावी. अनेक वर्षापासूनचा शिक्षकेतर आकृतीबंध जाहीर करावा. शिक्षण संस्थांना मालमत्ता कर व वीज बिलातून सुट मिळावी. यासह इतर समस्या सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने त्वरीत पाऊले उचलावीत व लक्ष वेधले जावे यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे एक दिवशीय बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन पुढील महिन्यात होणार असून ते यशस्वी करण्यासाठी संस्था चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी केले. सूत्रसंचलन डॉ.एन.डी.नांद्रे यांनी केले. आभार मुकेश पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी जयदेव पाटील, नरेंद्र पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी, भिमसिंग वळवी यांनी परिश्रम घेतले.
शिक्षण संस्था चालक संघ 2 नोव्हेंबरला शाळाबंद आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 1:03 PM