लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़ जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत १४२ जण कोरोनासोबत लढा देऊन घरी परत आले आहेत़ दरम्यान सोमवारी सकाळी ९ जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती देण्यात आली होती़ कालांतराने यातील एकास थांबवण्यात आले आहे़रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षातील २४ तर एकलव्य शासकीय वसतीगृहाच्या कोविड कक्षातील २३ अशा ४३ जणांना एकाच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला होता़ यातून जिल्ह्यात समाधानाचे वातावरण होते़ सोमवारी हे समाधान कायम राहिले असून सकाळी ८ जणांना घरी सोडण्यात आले़ यात भोणे ता़ नंदुरबार, शहरातील ज्ञानदीप सोसायटी, कोकणी हिल, सिद्धी विनायक चौक येथील प्रत्येकी एक तर तळोदा शहरातील मोठा माळीवाडा येथील ३ आणि खान्देशी गल्लीतील एक अशा ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़ सकाळी प्रशासनाने रेल्वे कॉलनीतील एकासही डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती़ मात्र थोड्या वेळानंतर संबधितास डिस्चार्ज दिला जात नसल्याचे सांगून थांबवण्यात आले आहे़ संबधित बाधितास थांबवण्याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही़ जिल्ह्यात आतापर्यंत १९० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. १४२ रुग्ण बरे होवून घरी गेल्याने आता जिल्हा रुग्णालयात ३७ जण उपचार घेत आहेत़ जिल्हा रुग्णालयाने २ हजार ११५ जणांचे स्वॅब घेतले आहेत़
सोमवारी जिल्हा रुग्णालयातून ३५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत़ यापूर्वी १२५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत़ यातून आजअखेरीस १६० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत़ तपासणी अहवाल मंगळवारी दुपारी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ दरम्यान एकलव्य वसतीगृहातील कोविड सेंटरमध्ये रेल्वे कॉलनीतील कोरोना बाधिताला शिफ्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़