लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी 19 रोजी सायंकाळी थांबणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने शुक्रवारी प्रचार रॅलींचा धुमधडाका झाला. ऑक्टोबर हीट प्रमाणेच प्रचारतोफांच्या धडधडाटामुळे वातावरणही चांगलेच तापले. जिल्ह्यात शुक्रवारी एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. परंतु उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचार रॅली आणि मतदारांच्या संपर्कावर भर दिला. रात्री नंदुरबारात भाजप उमेदवाराची जाहीर सभा झाली.
अक्कलकुवा मतदारसंघात केवळ शिवसेनेतर्फे जाहीर सभा घेण्यात आली. या ठिकाणी काँग्रेसतर्फे जाहीर सभा झाली नाही. मतदारांच्या संपर्कावर भर देण्यात आला. शहादा मतदारसंघात दोन मोठय़ा नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि जे.पी.नड्डा यांचा समावेश होता. याशिवा धावपटू देखील प्रचारात उतरला.नंदुरबार मतदारसंघात मात्र एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला होता.नवापूर मतदारसंघात शनिवारी होणारी अतित शहा यांची सभा वगळता येथे देखील भाजप, काँग्रेसने मोठय़ा सभा घेतल्या नाहीत.
मोठय़ा नेत्यांच्या झाल्या चार सभा
यंदाच्या विधानसभा निवडणूकांसाठी केवळ भाजप आणि शिवसेनेच्या मोठय़ा नेत्यांच्या सभांचे आयोजन केले होते. काँग्रेसतर्फे एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. भाजप-सेनेच्या एकुण चार नेत्यांनी सभा घेतल्या. शिवसेनेतर्फे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. एकच उमेदवार असल्याने त्यांची केवळ धडगाव येथेच सभा झाली.
भाजपतर्फे जिल्ह्यात एकुण तीन मोठय़ा नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. तळोदा येथे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सभा घेण्यात आली होती़ आता शनिवारी नवापूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा होणार असल्याने त्याकडे लक्ष लागून आह़े
यंदा प्रचार रथ नाहीच..
यंदा लक्षवेधी प्रचार झाले नाहीत. काही ठिकाणी कला पथकांचा उपयोग करण्यात आला. परंतु प्रचा रथ किंवा सजविलेली गाडी असा प्रकार कुठल्याही उमेदवाराने केल्याचे दिसून आले नाही.
जिल्ह्यातील उमेदवारभाजप - 3 शिवसेना - 1 राष्ट्रवादी - 0 काँग्रेस - 4 वंचित बहुजन आघाडी - 2 बहुजन समाज पार्टी - 1 मनसे - 0 अपक्ष - 9