घरोघरी पाया पडून चाैकशी
शहादा तालुक्यातील ब-याच गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. यात बाहेरगावी असलेल्या मतदारांना गावी बोलावण्याची चढाओढ सुरू आहे. अमका आला का, ढमका आला का, याची चाैकशी उमेदवार करत फिरत आहेत. बहुतांश बाहेरगावी असलेले मतदार हे नातेवाइकातीलच असल्याचे त्यांची चाैकशी करण्यासाठी उमेदवार सकाळपासून फे-या मारत असल्याचे दिसून आले. प्रत्येक घरातील ज्येष्ठांच्या पाया पडत त्यांची चाैकशी पूर्ण झाल्यानंतर येणा-यांची चाैकशी करण्याचे धारिष्ट्य उमेदवार दाखवत आहे. या प्रकारांनी मतदारही अचंबित होत असून नातलग असला तरी पाच वर्षे कधी पाय तर काय, तोंडावरही न बोलणारे चाैकशा करत असल्याने घरोघरी हशाही होत आहे.
विदर्भातील व्हिडिओचा येथेही धसका
विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान एका महिला मतदाराकडून पाच वर्ष न फिरलेला आणि ऐन निवडणुकीत तोंड दाखवणा-या एका उमेदवाराची महिला मतदार चांगलीच कानउघडणी करत असल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातही अनेकांकडून हा व्हिडिओ पाहिला जात आहे. हा व्हिडिओ पाहून एखादी महिला मतदार आपल्याला तर झापणार नाही ना, म्हणून गेल्या पंचवार्षिकला सदस्य म्हणून निवडून गेले गावातील वरिष्ठ आणि हक्काने बोलणा-या मतदार माता-भगिनींपासून अंतर ठेवून बोलत आहेत. त्यांनी एखादा शब्द काढल्यावर, मग करी टाकसूत ना.. असे सांगून उमेदवार थेट चालते होत आहेत. विशेष बाब म्हणजे नंदुरबार तालुक्यात एका माजी सरपंच महिला उमेदवाराला ताई तुम्हे यंदा उभ्या राह्येल शेत, निवडी येशात, पण पुढला पाच वरीसमा डायरेक मत मांगाले नका येजात... असे सुनावल्याने महिला उमेदवारही खजील झाल्या.