नंदुरबार जिल्ह्यात 13 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:45 AM
अक्कलकुवा तालुका : 26 डिसेंबर रोजी मतदान
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील सहा विभागात 734 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहिर केला़ या कार्यक्रमात जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आह़े या सर्व ग्रामपंचायत अक्कलकुवा तालुक्यात आहेत़ जिल्ह्यात नुकतेच 51 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली होती़ यात प्रथमच जिल्ह्यात लोकनियुक्त सरपंच निवडून देण्यात आल़े हा कार्यक्रम संपल्यानंतर सध्या तीन पालिका निवडणूकांची आचारसंहिता सुरू असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीपासून 13 ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहेत़ अक्कलकुवा तालुक्यातील खडकुना, टावली, मंडारा, खाई, कौलवीमाळ, कंकाळमाळ, कुवा, बेडाकुंड, बोखाडी, वडीबार, पेचरीदेव, ओहवा, वेली या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आह़े याअंतर्गत पाच डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येणार आहेत़ 12 डिसेंबररोजी अर्जाची छाननी, 14 रोजी माघार व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध आणि 26 डिसेंबर रोजी मतदान करण्यात येणार असून 27 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने कळवली आह़े निवडणूक कार्यक्रम लागू करण्यात आलेल्या 13 ग्रामपंचायती ह्या नव्याने निर्माण करण्यात आल्या आहेत़ तीन विभाजन झालेल्या ग्रामपंचायतींमधून 10 ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आह़े सोमवारपासून निवडणूक अधिकारी नियुक्तीसह विविध कामे सुरू होतील़