ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.5 - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात तीन जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सैताणे ता.नंदुरबार, दहेल, ता.अक्कलकुवा व खेतिया येथे घडली.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात वादळवा:यासह पाऊस सुरू आहे. रविवारी मात्र कुठेही पाऊस झाला नाही. तीन दिवसात तीन जणांना वीज पडून जीव गमवावा लागला.
शुक्रवारी सायंकाळी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात विजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाटामुळे तुरळक पाऊस झाला. सैताणे येथील जामसिंग रामसिंग भिल (60) हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने ते गावालगतच्या जगतराव टेकडीवर थांबले असता त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत हिरामण भिल यांनी खबर दिल्याने तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दुसरी घटना 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजता दहेल, ता.अक्कलकुवा येथे घडली. दहेलचा मोचलीपाडा येथील विनोद दाज्या वसावे (14) हा गावालगतच्या शेतात आंब्याच्या झाडाखाली वादळामुळे पडलेल्या कै:या वेचत होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत दाज्या दिवाल्या वसावे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात माहिती दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना खेतियाजवळील भातकी (मध्यप्रदेश) येथे घडली. ज्ञानसिंह जाडीया (30) हे आपल्या शेतात काम करीत असतांना 2 जून रोजी त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.