लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जिल्ह्याची भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती पर्यटनासाठी योग्य असतानाही पर्यटनस्थळ विकसित झाले नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. राज्य शासनाने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पर्यटनस्थळ विकसित केले पाहिजे. यामुळे परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मत नाशिक येथील फ्लॉवर गार्डची निर्मिती करणाऱ्या आर्किटेक निधी पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडले.नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एका वाटरपार्कमध्ये देशातील पहिल्या फ्लॉवर गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. दुबईच्या मिराकल गार्डनच्या धर्तीवर हे फ्लॉवर गार्डन असून येथे विविध प्रकारची तीन लाखापेक्षा अधिक फुलझाडे आहेत. या गार्डनच्या निर्मितीचे श्रेय शहादा येथील सेवानिवृत्त उपअभियंता शरद पाटील यांच्या स्नुषा निधी पाटील यांना जाते. सुमारे एक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आर्किटेक निधी पाटील यांनी या गार्डनचे डिझाईन व निर्मिती केली आहे.याबाबत माहिती देताना आर्किटेक निधी पाटील म्हणाल्या की, मी नंदुरबार जिल्ह्याची सून आहे. आपल्या जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत मात्र ते विकसित नाहीत, ते विकसित करण्याचे गरज आहे. राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आपल्या जिल्ह्यात आहे. याठिकाणी काम करावयास संधी आहे. निसर्गाने मुक्तहस्ते या परिसराला भरभरून दिले आहे. हा संपूर्ण परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे. अशा ठिकाणी सात ते आठ एकर जागा वनविभाग व राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्यास जागतिक दर्जाचे फ्लॉवर गार्डन उभे राहू शकते.या फ्लॉवर गार्डनमुळे पर्यटनस्थळ म्हणून तोरणमाळ अधिक नावारूपाला येईल त्याचप्रमाणे येथे येणाºया पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळेल व पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटता येईल. मी नाशिक येथे देशात पहिला प्रयोग केला व तो यशस्वी ठरला असून अनेक निसर्गप्रेमी व पर्यटकांनी नाशिकच्या फ्लॉवर गार्डनला भेट देऊन आपला अभिप्राय दिला आहे. त्याच धर्तीवर माझ्या जिल्ह्यात असा प्रयोग करण्याची माझी इच्छा आहे. आपले भारतीयांचे दुर्दैव आहे की आपल्याच देशात निर्माण करण्यात येणाºया विविध फुलझाडांच्या प्रजाती यांची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. याच फुलझाडांच्या प्रजातींचा वापर करून एक अद्ययावत असे फ्लॉवर गार्डन तोरणमाळला सहजपणे निर्माण होऊ शकेल.नाशिक येथील फ्लॉवर गार्डनची निर्मिती केल्याबद्दल विविध संस्था व पदाधिकारी यांच्या वतीने निधी पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषदेला सेवानिवृत्त उपअभियंता शरद पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम पाटील, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.एल. पाटील, अभियंता सुशांत पाटील उपस्थित होते.
पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास रोजगाराची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 1:11 PM