तळोदा : लोकसमन्वय प्रतिष्ठान व यूएसके फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यात पाच अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये कुपोषण निमरूलन प्रक्रिया सक्षमीकरण योजना राबवीत आहे. या योजनेचे मंगळवारी रोझवा पुनर्वसन येथे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, तहसीलदार योगेश चंद्रे, एकात्मिक बालविकास अधिकारी भाऊसाहेब बोरकर (तळोदा), गणेश माल्टे (अक्कलकुवा), तळोदा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण, साक्री येथील डॉ.विजया अहिरराव, युएसके फाऊंडेशनच्या दिपाली खोरे (पुणे), लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे व लोकसमन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन आदी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचे स्वागत गावातील किशोरी विकास मंचच्या किशोरवयीन मुलींनी आपल्या पारंपरिक पेहरावात ढोलसह नृत्याने केले. या वेळी सर्व ग्रामस्थ, सरपंच विद्या पावरा, पोलीस पाटील करुणा पावरा, अंगणवाडी कार्यकत्र्या उपस्थित होते. या वेळी गावातील महिला व किशोरवयीन मुली यांच्यासाठी लोकसमन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीने सॅनेटरी नॅपकीनचे वेंडिंग मशीनही बसविण्यात आले. त्याचे अनावरण डॉ.विजया अहिरराव यांनी केले.प्रास्ताविकात प्रतीभा शिंदे यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी, मोरंबा, रोजकुंड, गुलीआंबा व रोझवा पुनर्वसन या पाच गावात एका वर्षात शून्य कुपोषण असेल यासाठी पुणे येथील यूएसके फाऊंडेशन यांच्या मदतीने हा पथदर्शी प्रकल्प आम्ही सुरु करीत असल्याचे सांगून शासकीय प्रशासनाने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना असून त्या सर्व योजना गावार्पयत पोहोचविण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटीबद्ध राहील. परसबाग व महिला बचत गटांना उद्योग उभा करायला आम्ही उत्सुक असल्याचे ते म्हणाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदाळे यांनी किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती फिल्म व लायब्ररी तसेच युवकांना व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग चालू करण्यास मदत करू व शेती सुधारण्यासाठी मदत करण्यात येईल, असे सांगितले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन यांनी शासन या प्रकल्पात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सर्व मदत करेल, असे सांगितले. डॉ.विजया अहिरराव यांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयएमएच्या माध्यमातून महिला, मुली व बालकांची नियमित तपासणी केली जाईल, असे सांगितले. सूत्रसंचालन दीपाली पाटील यांनी तर आभार विद्या पाटील यांनी मानले.
नंदुरबार जिल्ह्यात पाच अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये सक्षमीकरण योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:04 PM