लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : रूळमालपाडा, ता.धडगाव येथे डाकिणीच्या संशयावरून महिलेचा छळ होत असल्याबाबतचे निवेदन अंनिसचा कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांना दिले होते. या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी सपकाळे यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांसोबत रूळमालपाडा गाठले. परंतु हा सर्व प्रकार गैरसमजातून घडला असल्याचे स्पष्ट केले. या वेळी संबंधितांचे प्रबोधनदेखील करण्यात आले.शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी अंनिसच्या भारती पवार, संगीता पाटील उपस्थित होत्या. सपकाळे म्हणाले की, घटना घडल्यानंतर धडगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई यापूर्वीच केली आहे. पीडिताच्या घरी भेट दिली असता संबंधित आजही बेडवर आहे. आजाराचे निदान लवकर झाले नसल्याने गैरसमज निर्माण झाला. वैद्यकीय उपचार करण्याऐवजी भगत व तत्सम मांत्रिकाकडे उपचार केल्याने आजाराचे प्रमाण वाढत गेले. शेवटी अंधश्रद्धेतून डाकिणीचा संशय आला. परंतु असे काहीही नाही. सर्व प्रकारच्या गोष्टीवर पडदा टाकून सर्वांची समजूत काढली आहे.भारती पवार यांनी पीडिताच्या मुलीला विश्वासात घेत तिच्या मनातील सर्व गैरसमज दूर केले. त्या म्हणाल्या की, प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा पीडित हजर नव्हते. आरोपीकडे गेलो असता ते आजारी होते. पीडित आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद असून, डाकीणप्रथा बंद व्हावी यासाठी अंनिसतर्फे प्रयत्न करण्यात येतील. पीडितांच्या मुलीला अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी समजावले आहे.
अंनिस व पोलीस प्रशासनाकडून प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:20 PM