प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आहे. तसेच संगमेश्वर येथे त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी दरवर्षी तापी मातेला साडी-चोळी अर्पण करण्यासाठी भाविक येत असतात. मात्र, कोरोना महामारीमुळे येथे कोणतेही कार्यक्रम घेण्यात आलेले नाहीत.
याबाबत असे की, दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिराच्या सभामंडपात सूर्यकन्या तापी मातेची संगमरवरी मूर्ती आहे. तापी नदीत स्नान करून आलेले भाविक सूर्यकन्या तापी मातेचे दर्शन घेतात. एवढेच नव्हे, तर संगमेश्वर मंदिर परिसरात तापी, गोमाई व पुलिंदा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. येथे आलेले भाविक तापी नदीत स्नान करून तापी मातेला साडी-चोळी व शृंगार अर्पण करून पूजन करतात. यानंतर संगमेश्वर महादेवाचे दर्शन घेतात. गेल्या वर्षीदेखील शेकडो भाविक पूजा करण्यासाठी आले होते. मात्र, सध्या कोरोना काळ सुरू असल्याने येथे होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.