नंदुरबार शहरात कोणत्याही भागात आग लागल्यास फोन आल्यानंतर दोन तयार वाहनांपैकी एक वाहन तातडीने मार्गाला लागते. अंतर कितीही असो केवळ १० मिनीटात वाहन पोहोचायला हवे असे निश्चित आहे. परंतू या १० मिनीटाच्या काळात किमान ५० किंवा त्यापेक्षा अधिक फोन हे साबळे यांना अटेंड करावे लागतात. गाडी निघाली का, येथपासून ते आली कशी नाही अजून, अरे काय करता तुम्ही अशा तिखट प्रश्नांचा माराही सहन करावा लागतो. यातून मनस्थिती खराब होण्याची शक्यता अधिक असते. परंतू आग लागलेली व्यक्ती संकटात आहे. त्याला अधिक गरज असल्याचा विचार मनात ठेवून उर्मटपणे उत्तर न देता, केवळ सत्यता सांगून समाधान केले जाते. यातून समोरचा आश्वस्त होत असल्याचे साबळे सांगतात. अत्यंत कठीण अशा कामासाठी डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर या दोघांचीच गरज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान बाहेरगावी गेल्यास दुसरा कर्मचारी नियुक्त करुन जातो. परंतू अनेकांकडे मोबाईल नंबर असल्याने ते फोन करुन आगीच्या घटनेची माहिती देतात. अशावेळी सर्व व्यवस्था करुन देेण्यास प्राधान्य द्यावे लागते.
इतरांच्या कुटूंबांची काळजी
नंदुरबार येथील अग्नीशमन दलाकडे चार वाहने आहेत. यातील दोन वाहने ही कायम तैनात असतात. एखादी घटना घडल्यास फोन आल्यावर समोरच्या व्यक्तीला माहिती देणेही एक काैशल्य आहे. साबळे हे अगदीच घाबरुन न जाता समोरच्याला स्पष्ट आणि मोजक्या शब्दात पत्ता सांगतात.
नंदुरबार शहरासोबतच बाहेरगावीही अग्नीशमन वाहन पाठवण्याचे आदेश आहेत. समोरुन संपर्क करणा-याची संपूर्ण माहिती केवळ काही वेळात घेत चालकाला त्याचा उलगडा करुन द्यावा लागतो. ही सर्व प्रक्रिया करताना फक्त आणि फक्त संयम बाळगणे हेच महत्त्वाचे असल्याचे साबळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यातून गोंधळ कमी होवून योग्य ठिकाणी गाडी जाते.n अत्यावश्यक सेवेत काम करताना स्वत:ला मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवणेही गरजेचे असते. कोणत्याही वेळ संकटात सापडलेले संपर्क करणार याची जाणीव ठेवत काम करावे लागत असल्याचे येथील इतर कर्मचा-यांनी सांगितले.
आगीच्या घटना ह्या सांगून होत नाहीत. रात्री-अपरात्री कधीही फोन येवू शकतो. यातून मग आपल्यापेक्षा समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असते. कुटूंबियांना कामाचे स्वरुप माहिती असल्याने त्यांनी कधीही त्रास न करुन घेता प्रोत्साहन दिले.
-जयराज साबळे, मोटरवाहन निरीक्षक. नंदुरबार.