भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राज्य व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार राबवण्यात येत आहे़ यांतर्गत आतापर्यंत १ लाख बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे़ तपासणीदरम्यान २ हजार ७८८ सॅम बालके आढळून आली आहेत़ त्यांना पोषण पुनवर्सन केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे़लॉकडाऊन काळात जिल्ह्यात सॅम-मॅम बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांची तपासणी, लसीकरण व नियमित उपचारांमध्ये अडथळे येत होते़ समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बैठका घेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून विशेष मोहिमेचे नियोजन केले होते़ यानुसार वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक अशा सदस्यांची एकूण १९२ पथके दुर्गम भागातील दोन तालुक्यांसाठी निर्माण करण्यात आली होती़ या पथकांनी मे आणि जून या दोन महिन्यात धडगाव, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा तालुक्यातील एक लाख बालकांच्या तपासण्या पूर्ण केल्या आहेत़ केवळ तपासणीवर न थांबता आरोग्य विभागाकडून दोन महिन्यात लसीकरण मोहिमेलाही वेग देण्यात आला होता़ यातून चार तालुक्यातील आरोग्य समस्या निकाली निघाली आहे़२९ मे पासून ही आरोग्य तपासणी मोहिम प्रत्यक्षात सुरू करण्यात आली होती़ १९ जूनपर्यंत चार तालुक्यात ० ते ६ वर्ष वयाच्या बालकांची तपासणी झाली़तपासणीसाठी अक्कलकुवा ६१, धडगाव ४५ अशा १०६, तळोदा २६ तर शहादा ६० अशा ८६ पथकांची निर्मिती करण्यात आली होती़ एकूण १९२ पथकांनी चार तालुक्यातील १ हजार ६९२ पैकी १ हजार ६१४ अंगणवाडी केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे़१ हजार ६१४ अंगणवाड्यांमध्ये एकूण १ लाख २१ हजार ९८४ बालक आहेत़ यातील १ लाख ४ हजार ७११ बालकांच्या तपासण्या पथकांनी पूर्ण केल्या आहेत़ यातील १७ हजार २७३ बालके ही विविध कारणांमुळे गैरहजर असल्याची माहिती देण्यात आली आहे़तपासणीत २ हजार ७८८ सॅम तर १३ हजार २३२ बालके ही मॅम असल्याचे समोर आले आहे़ सॅम बालकांवर पोषण पुनवर्सन केंद्रांत उपचार सुरु करण्यात आले आहेत़चार तालुक्यात नियुक्त करण्यात आलेल्या पथकांकडून प्रत्यक्ष गावात जाऊन बालक व मातांची तपासणी करण्यात आली आहे़चार जुलैपासून नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील आरोग्य विभागाकडून पथकांची निर्मिती करुन माता व बालकांची तपासणी सुरू केली जाणार आहे़ यासाठीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे़या तपासणी मोहिमेतून वंचित राहिलेल्या १७ हजार २७३ बालकांचा शोध घेऊन त्यांची पुन्हा तपासणी करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे़नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी नवीन कुपोषित बालकांचा शोध घेणे, बालकांचे लसीकरण, गरोदर व स्तनदा माता यांची तपासणी व उपचार करण्याची कामे दोन महिन्यात केली आहेत़जिल्हाधिकारी डॉ़भारुड व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या सूचनेनुसार दोन महिने कामकाज पूर्ण करण्यात आले आहे़ उर्वरित नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील माता व बालकांची तपासणीही लवकरच सुरू करण्यात येणार आहे़-डॉ़ एऩडी़बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबाऱ
जिल्ह्यातील एक लाख बालकांची तपासणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:47 AM