नंदुरबार : राज्यात नाशिक,नागपूर व मुंबईनंतर नंदुरबारात बुधवारी जनजाती सुरक्षा मंचतर्फे डि लिस्टींग मेळावा घेण्यात आला. यावेळी धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली. मेळाव्याला हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.दरम्यान, मेळाव्याला विरोधासाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केेले.
जनजाती सुरक्षा मंचतर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. आदिवासींची पारंपारिक वेशभूषा, वाद्यासह पथके सहभागी झाली होती. त्यानंतर नवापूर चौफुलीवर मेळावा घेण्यात आला. यावेळी विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. ज्या व्यक्तीने आदिवासी परंपरा, आदिम श्रद्धा आणि विश्वास यांचा त्याग केला आहे आणि इतर धर्म स्विकारला आहे तो अनुसूचित जमातीचा सदस्य मानला जाणार नाही या १० जुलै १९६७ च्या संयुक्तत संसदीय समितीच्या शिफारसीचा उल्लेखावर भर देण्यात आला. त्यानुसार धर्मांतरीत व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
दरम्यान, या मेळाव्याच्या विरोधात विविध आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. मेळावा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.