शहादा : शहाद्यातील चौघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. चौघांमध्ये एक माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. प्रांताधिकारी यांनी हे आदेश मंगळवारी उशीरा काढले. आणखी काही जणांची देखील हद्दपारी लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये माजी नगरसेवक महेमुद उर्फ मुन्ना अहमद शेख रा. गरीब नवाज कॉलनी शहादा, एमआयएम पक्षाच्या विद्यमान नगरसेविका यांचा मुलगा साजिद रहीम पिंजारी रा.शहादा, एमआयएम पक्षाच्या नगरसेविका व आरोग्य सभापती सायराबी लियाकत सैय्यद यांचा मुलगा मोहम्मद अली लियाकत अली सैय्यद रा.शहादा व आत्माराम मोतीराम शेमळे रा. वाघोदा ता. नंदुरबार ह.मु. मलोणी ता. शहादा यांचा समावेश आहे. या चौघांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे शहादा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याबाबतचा प्रस्ताव शहादा पोलीस ठाण्यातून पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला होता. तेथून प्रांताधिकारी कार्यालयात गेल्यावर प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी याबाबतचे आदेश त्वरेने काढून चौघांची एका वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपारी केली. चौघांमध्ये तीनजण राजकीय पक्षाशी संबधीत असल्याने खळबळ उडाली आहे. प्रांताधिकारी कार्यालयात आणखी काही प्रकरणे असून त्यावर देखील लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे हिस्ट्रीसिटर असलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यापूर्वीच अशा प्रकारचे पाऊले उचलून संबधीतांवर वचक ठेवणे आवश्यक होते अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शहाद्यातील चौघे वर्षभरासाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:39 AM