लोणखेडा, ता.शहादा येथे सहकार महर्षी स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदार व खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मंत्र्यांचा ताफा शिरपूरमार्गे लोणखेडाकडे गेला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार जयकुमार रावल यांचा ताफा दोंडाईचाकडून सारंगखेडामार्गे लोणखेडा येथे पोहोचले. त्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस हे शिरपूर येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शहादा-शिरपूर रस्त्याने रवाना झाले. आता खुद्द सत्ताधारी व विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच या दोन्ही रस्त्यांवरुन प्रवासाचा अनुभव घेतल्याने आता तरी या रस्त्यांचे भाग्य उजळेल का? अशा खोचक प्रतिक्रिया त्रस्त नागरिक व वाहनधारकांनी व्यक्त केल्या.
शहादा ते शिरपूर व सोनगीर ते शहादा या दोन्ही रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.