प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बेडकीपाडा येथील आर.आर. इन्फॅक्ट टायर प्लांटमध्ये जुनाट टायर जाळून त्यापासून केमिकल तयार केले जाते. बॉयलरमध्ये अचानक गॅस तयार होऊन विस्फोट झाल्याने कंपनीत काम करणारे राकेश शृंगार (२३) व पंकज वाघेला (२४) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गुजरात राज्यात नेण्यात आल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक शर्मा यांनी दिली.
बेडकीपाडा येथील स्थानिक ग्रामस्थांना टायर प्लांटमध्ये दुपारी मोठा विस्फोट झाल्याचा आवाज आला होता. दोन्ही कामगार तीन चार फूट उंच फेकले गेले होते. या स्फोटामुळे परिसरात किरकोळ आग लागली. कंपनीतील कामगारांनी आग आटोक्यात आणली, अशी माहिती स्थानिक कामगारांनी दिली. परंतु कंपनीचे व्यवस्थापक शर्मा यांनी स्फोट झाला नसल्याचा दावा केला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण व महसूल कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
या टायर प्लांटमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे असे प्लांट नवापूर तालुक्यात बंद करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. अनेकवेळा मोर्चे, निवेदने देऊनही ठोस कारवाई करण्यात न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी या टायर प्लांटमध्ये स्फोट होऊन मोठी आग लागली होती. तरीही संबंधित प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना केली नाही. महसूल विभागाने अशा धोकादायक असणाऱ्या कंपन्यांवर लक्ष देऊन योग्य कारवाई करणे गरजेचे आहे.