सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात एरंडीचे पीक काढणीवर आले असून अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आहे.परिसरात मागील काही वर्षापासून बहुतेक शेतकरी एरंडीचे उत्पादन घेत आहेत. येथील शेतकरी भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवत ज्या पिकाला मागणी आहे त्याच पिकाची लागवड करण्यावर भर देतात. एरंडीला तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात राज्यात मोठी मागणी असते. त्यामुळे याठिकाणी या पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परिसरातील काही प्रयोगशील शेतक:यांनी मागीलवर्षी लागवड केलेल्या एरंडी पिकाच्या झाडावरील आजूबाजू वाढलेल्या फक्त फांद्या तोडून पीक तसेच राखून ठेवले. परिणामी कमी खर्चात पिकाची जोमदार वाढ होऊन मागील वर्षाच्या निघालेल्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा सुरवातीपासूनच पहिल्या वर्षापेक्षा जास्त प्रमाणात लागलेली एरंडी यामुळे उत्पादनात तीन ते चार पट वाढ होण्याची शक्यता आहे. परिपक्व पिकांची आतापासूनच काढणी सुरु झाल्याने प्रयोगशील शेतकरी आनंदात आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पिकावर अळ्यांच्या अचानक झालेल्या आक्रमणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. परिसरात सर्वाधिक पीक एरंडीचे घेतले जात असल्याने अळ्यांमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या अळ्यांचे पिकाच्या पानांवरच आक्रमण होत आहे. अळ्या संपूर्ण पान हळूहळू खाऊन टाकत असल्याने पीक निरूपयोगी ठरत आहे. विशेषता पानाच्या पृष्ठभागावर या अळ्यांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकाची पाने कोरडी पडत असून ऐन वाढीच्या व फळधारणेच्यावेळी अशाप्रकारे अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत शेतक:यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एरंडीवर अळ्यांच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 3:55 PM