लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादीत मालाची विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच व्यापारीही मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत. या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा पर्याय शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात आला असून हे काम अव्याहतपणे कृषी विभागाकडून व नगरपालिका तसेच भूमीपुत्र शेतकरी गट यांच्यामार्फत शहरातील वृंदावननगर येथून सुरुवात करण्यात आली.या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती अभिजित पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, कृषी मंडळ अधिकारी राहुल धनगर, नगरसेवक संदीप पाटील आदी उपस्थित होते. शहरातील ग्राहकांना मागणीनुसार घरपोच भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०० रुपयात १३ प्रकारचा भाजीपाला देण्यात येत आहे. तालुक्यातील भाजीपाला फळे उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करून रितसर वाहतूक परवाना मिळवून देणे, फळे-भाजीपाला मागणीची नोंद घेणे, क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविणे, वाहतूक आढावा घेऊन त्यानुसार शेतकºयांना विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, तालुका, जिल्हा, नगरपालिका, या जिल्ह्यांतर्गत मागणीसह राज्यातील इतर जिल्ह्यात व इतर राज्यात मागणीप्रमाणे फळे भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राहुल खेडकर, राकेश निकम, रायमल पावरा, पंकज वळवी हे मार्गदर्शन करीत आहे.तालुक्यात कृषी विभागाच्या माध्यमातून टरबूज व इतर फळांची विक्री शेतकरी ते ग्राहक थेट करण्यात येत असून संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात अशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी तर गाव स्तरावर कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व कृषीमित्रांचे सहकार्य लाभत आहे.
लॉकडाऊन काळात शेतातील माल खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे येत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तालुका कृषी विभाग, नगरपालिका व भूमिपुत्र शेतकरी गटाने पुढाकार घेऊन नागरिकांना ताजा भाजीपाला मिळणार आहे. यात शेतकरी व ग्राहक दोन्हींचा फायदा आहे.-अभिजित पाटील, सभापती, कृषी व बांधकाम, जि.प. नंदुरबार.सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करून भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. भाजीपाला व फळांचा योग्य प्रमाणात पुरवठा होईल याची काळजी घेतली जात आहे. या उपक्रमांमुळे भाजी बाजारात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील विविध गावातील सर्वच भाजीपाला व फळांची विक्री होत आहे.-किशोर हडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा.संचारबंदी शिथिलतेच्या काळात नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. पालिका प्रशासनामार्फत पाच ठिकाणी तात्पुरते भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले असले तरी याठिकाणी विक्रेते व ग्राहकांकडून शासकीय नियमांची अंमलबजावणी गांभीर्याने होत नाही. भूमिपुत्र गट, कृषी विभाग व शेतकरी यांच्या समन्वयातून हा अत्यंत चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे.-राहुल वाघ, मुख्याधिकारी, नगरपालिका शहादा.