तालुक्यात शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात आठ ते दहा शेतकऱ्यांच्या वीज मोटरी, तसेच १० ते १२ शेतकऱ्यांच्या वायरिंग (केबल) चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. अगोदरच शेतीमालाला भाव नाही, उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. अतिवृष्टीमुळे तर शेतकरी पुरता कोलमडला आहे. सुरळीत वीजपुरवठा नसल्याने पिकांना पाणी देणे जिकिरीचे जाते. अशा परिस्थितीत विद्युत मोटर व केबल यांच्या चोरीच्या घटनेने शेतकरी हतबल झालेला आहे. पोलीस प्रशासनाकडे तक्रार देऊनदेखील चोरीच्या घटनांचा तपास लागत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात गेल्या १८ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत होऊन व्यापार-व्यवसाय स्तब्ध झाले. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. शेतीसाठी लागणारे अवजारे, कृषीपंप, बी-बियाणे, खते यांच्या किमती मात्र गगनाला पोहोचल्या आहेत. शेतीतील उत्पन्न बाहेर निघाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत होता. शेतकरी आपली कोरडवाहू शेती कूपनलिकेच्या साहाय्याने बागायती करू लागला. नांदरखेडा परिसरात शेतकऱ्यांनी २०-२५ हजार रुपये खर्च करून विद्युत मोटारी बसविल्या. मात्र, चोरट्यांनी त्याच्यावर डल्ला मारून त्या चोरून नेल्या. नांदरखेडा परिसरातील सुभाष पाटील, जीवन रामजी पाटील, हेमंत पाटील यांच्यासह सहा ते सात शेतकऱ्यांच्या वीज मोटारी, तसेच समीर पाटील, कैलास सुदाम पाटील यांच्यासह आठ ते दहा शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारीच्या वायरिंग असा सुमारे लाखो रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार करून चोरट्यांना अटक करण्याची व शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत चोरटे सापडले नाही. मात्र चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शेतकऱ्यांनी आता जीवन कसे जगावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा व हे चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कृषी पंप व केबलच्या चोरीने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:30 AM