तापी काठावरील २२ उपसा सिंचन योजना कार्यान्वित व्हाव्या यासाठी याआधीही २० ऑक्टोबर २०२० रोजी संबंधित योजनांचे पदाधिकारी व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनावजा विनंतीवरून योजनांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते.
२० ऑक्टोबर २०२०रोजी नंदुरबार मध्यम प्रकल्प नंदूरबार येथे संबंधित विभागाच्या अधीक्षक अभियंता धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे पदाधिकारींनी चर्चा केली होती तरी यावेळी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत नंदूरबार व धुळे जिल्ह्यातील तापीकाठावरील २२ उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांचा सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल शासनस्तरावर सादर करून मंजूर करून घेण्यात येऊन उर्वरित कामांना तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार २० ऑक्टोबर २०२० रोजी होऊ घातलेल्या आमरण उपोषणास स्थगिती दिली होती; परंतु शासनस्तरावर आतापर्यंत कुठलीही सकारात्मक कार्यवाही होताना दिसत नाही म्हणून २२ उपसा सिंचन योजनांचे शेतकरी हवालदिल झाले असून, शासन आपल्या वाजवी मागणीकडे कानाडोळा करत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित योजनांचे पदाधिकारी व शेतकरी हे दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता प्रकाशा बॅरीज येथे जलसमाधी घेणार आहेत तरी याची तातडीने नोंद घ्यावी अन्यथा पुढील परिणामास शासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
उपसा सिंचन योजनांबाबत शासनस्तरावर कुठलीही सकारात्मक कार्यवाही होताना दिसत नसल्याने शासनाचे लक्ष संबंधित योजनांकडे वेधले जावे यासाठी जलसमाधी घेणारे शेतकरी जिजाबराव गोरख पाटील धमाने, विजय महेंद्रलाल गुजराती कोपर्ली, यशवंत लिंबाजी पाटील, राजाराम दगडू पाटील, रवींद्र उत्तम पाटील कहाटूळ, संजय लक्ष्मण पाटील शिरूळ, रितेश खेमराज बोरसे कळंबू, विनोद चिंतामण पाटील पुसनद, सखाराम राजाराम चौधरी, यशवंत जगन्नाथ पाटील लहान शहादे, रवींद्र शंकर पाटील शिंदे, राजेंद्र विलास पाटील खोडसगाव हे शेतकऱी जलसमाधी घेणार असून, त्यांनी निवेदनात आपली नावे दिली आहेत.